खा. सुप्रिया सुळेंचे थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र, म्हणाल्या – ‘डेलकर यांची आत्महत्या हा तर थेट संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दरम्यान या प्रकरणी आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून डेलकर आत्महत्या प्रकरणावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मोहन डेलकर यांची आत्महत्या हा फक्त एका जिवाचा अंत नसून तो थेट देशाच्या संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का असल्याचे सुळे यांनी पत्रात म्हटले आहे.

लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना लिहलेल्या पत्रात खासदार सुळे यांनी म्हटले आहे की, सात वेळा खासदार राहिलेले मोहन डेलकर यांनी लोकसभेत केलेल्या शेवटच्या भाषणामध्ये त्यांच्यावर असलेल्या प्रचंड मानसिक तणावाविषयी आणि दादरा-नगर हवेलीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर टाकलेल्या दबावाविषयी पोटतिडकीने सांगतिले होते. त्यांनी आत्महत्या केली. पण संसदेच स्वातंत्र्य अन् सर्वोच्च स्थान हे सभागृहातल्या सदस्यांना कोणत्याही प्रकारच्या भिती वा दबावाशिवाय काम करण्याच्या मिळणाऱ्या वातावरणात सामावल्याचे त्या म्हणाल्या. तसेच या पत्रात त्यांनी डेलकर यांच्या आरोपांची चौकशी करण्याची विनंती लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. आपण सभागृहाचे पालक आहात. त्यामुळे डेलकर यांनी सभागृहात केलेल्या आरोपांची चौकशी करावी, हे प्रकरण संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवावे, असेही सुळे यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान देखील डेलकर आत्महत्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे.