SSR Death Case : 15 कोटी रूपये गायब झाल्याची माहिती कशी मिळाली ? ED नं सुशांतच्या वडिलांना विचारलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   दिवंगत अ‍ॅक्टर सुशांत सिंह राजपूतचे अकाउंट आणि पैशांच्या व्यवहारांचा तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुशांतचे वडिल के. के. सिंह यांची दिल्लीत चौकशी केली आहे. सूत्रांनुसार ईडीने के. के. सिंह यांना विचारले की, त्यांना सुशांतच्या अकाऊंटमधील 15 कोटी रूपये गायब झाल्याची माहिती कशी मिळाली. सुशांत सिंह राजपूत केसमध्ये ईडी मनी लाँड्रिंगच्या दृष्टीने अ‍ॅक्टरच्या बँक खात्याची चौकशी करत आहे, या तपासात आतापर्यंत अनेक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

के. के. सिंह यांनी नोंदवला जबाब

के. के.सिंह यांनी बिहारमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत रिया आणि तिच्या कुटुंबावर आरोप केला होता की, ते सुशांतच्या पैशांवर पार्ट्यां करत असत, सोबतच त्याच्या पैशाने अनेक कंपन्या सुद्धा खरेदी करण्यात आल्या होत्या. के. के. सिंह यांनी सुशांत सिंहच्या अकाऊंटमधून 15 कोटी रूपये गायब झाल्याचा दावा केला होता. या आरोपानंतर रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढल्या आहेत.

ईडीला लेखी आरोप दिले

सूत्रांच्या माहितीनुसार, केके सिंह सोमवारी ईडीसमोर हजर झाले होते. ईडीच्या चौकशीत त्यांनी त्या सर्व मुद्द्यांवर आपले जबाब नोंदवले, ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या एफआयआरमध्ये केला होता. के. के. सिंह यांनी आपले आरोप लेखी स्वरूपातही ईडीला दिले आहेत.

रियाचे सुशांतच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप

शुक्रवारी सुशांतच्या बँक अकाऊंटबाबत ईडीने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकची अनेक तास चौकशी केली. रिया आणि शौविक सुशांतच्या चार कंपन्यांमध्ये भागीदार होते. यावेळी ईडीच्या चौकशीत रिया चक्रवर्तीने सुशांतच्या कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले. सुमारे 9 तास चाललेल्या या चौकशीत रियाने अनेक महत्वाच्या प्रश्नांवर मला काही आठवत नाही, असे म्हणून उत्तरे देण्याचे टाळले.

4.30 कोटींची एफडी मोडली

ईडीने सुशांतच्या एका एफडीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सुशांतच्या खात्यातून 2 दिवसात 4.30 कोटी रूपयांची एफडी मोडण्यात आली, यास ईडीने संशयास्पद म्हटले आहे. ईडीने या एफडीवरून रिया चक्रवर्ती आणि श्रुती मोदीला प्रश्न विचारले आहेत. श्रुतीने उत्तरात म्हटले की, याबाबत तिला काहीही माहित नाही, कारण बँकेचे काम ती पहात नव्हती.