सुशांतचे फेक व्हिडिओ अपलोड करून 25 वर्षांच्या इंजिनीअरनं 4 महिन्यात कमावले लाखो रूपये, आता झालं असं काही

पोलीसनामा ऑनलाइन – बिहारमधल्या एका यूट्यूबरवर बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) चे फेक व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी जेव्हा तपास केला गेला तेव्हा अशी माहिती समोर आली की, या व्यक्तीनं गेल्या 4 महिन्यांत सुशांतचे फेक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करून तब्बल 15 लाखांपेक्षा जास्त कमाई केली आहे. राशिद सिद्दीकी असं या आरोपीचं नाव आहे. तो 25 वर्षांचा आहे, असंही समजत आहे.

राशिद हा इंजिनियर आहे. त्यानं एफएफ न्यूज नावानं यूट्यूब चॅनेल सुरू केला होता. एका इंग्रजी वृत्तानुसार, राशिदवर बदनामी, सार्वजनिक गैरव्यवहार आणि हेतुपुरस्सर अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार, मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या विरोधात राशिदनं पोस्ट केलेल्या व्हिडिओजला लाखो व्ह्यूज मिळाले होते.

सुरुवातीला सुशांतच्या निधनासंबंधित अपलोड केलेल्या व्हिडिओला अधिकाधिक व्ह्यूज मिळत गेले. सप्टेंबरमध्ये त्यानं साडेसहा लाखांची कमाई केली होती. त्यानंतर त्याचे सब्सक्राईबर्स वाढू लागले होते. सुशांतच्या निधनाआधी त्याचे 2 लाख सब्सक्राईबर्स होते, तर आता हा आकडा 3.70 लाखांवर गेला आहे.

सुशांतच्या निधनाविषयी जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता होती. राशिदनं याचा वापर पैसे कमावण्यासाठी केला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे.