‘त्या’ अधिकाऱ्याला निलंबित करा

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन – कोठला परिसरातील तीन वर्षीय बालकाचा मृत्यू मोकाट कुत्र्यामुळे झालेला आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणी करीत नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढून उपायुक्तांना घेराव घातला आहे. या घटनेवरून नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

आज सकाळी कोठला परिसरातील घासगल्ली येथे घरासमोर खेळणाऱ्या तीन वर्षे बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर दुखापत होऊन उपचार घेणाऱ्या बालकाचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेवरून कोठला परिसरातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा नेऊन उपायुक्तांना घेराव घातला आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही, असे नागरिकांकडून सांगितले जात होते.

नगरसेवकही झाले आक्रमक
तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यूप्रकरणी महापालिकेचे सर्व नगरसेवकही आक्रमक झाले आहेत. आज महापालिकेची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यानच बालकाचा मृत्यू झाल्याने नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नगरसेकांकडून केली जात आहे.