निलंबीत DIG निशिकांत मोरेंना तूर्तास दिलासा नाहीच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई उच्च न्यायालयानं डीआयजी निशिकांत मोरे यांना अटकेपासून तुर्तास कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली आहे. डीआयजी मोरे हे गुन्हा दाखल झाल्यापासून गायब असल्याने त्यांना सत्र न्यायालयानं कोणताही दिलासा दिलेला नाही. याबाबतीत विचार हा पुढील सुनावणीत करण्यात येईल असं न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच विनयभंग झाल्याचा आरोप करण्यात आलेल्या त्या मोबाईल क्लीप्सचा सविस्तर पंचनामा करून त्याचा अहवाल पुढील सुनावणीत सादर करण्याचे निर्देश देखील न्यायालयानं दिले आहेत.

निशिकांत मोरेंच्या वतीने शुक्रवारच्या सुनावणीत दावा केला होता की त्यांच्याजवळील असणाऱ्या मोबाईल क्लीपमध्ये पीडित मुलीचा कोणत्याही प्रकारे विनयभंग झाल्याचं स्पष्ट होत नाही. त्यामुळे हे आरोप चुकीचे असून हे केवळ दोन कुटूंबियांमध्ये आर्थिक व्यवहारावरून निर्माण झालेल्या वादावरून करण्यात आल्याचे पुरावे त्यांनी कोर्टापुढे मांडले. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर सुसाईड नोट लिहून घरातून निघून गेलेली अल्पवयीन मुलगी ही तिच्या प्रियकरासोबत गेल्याचं स्पष्ट झालं असून नवी मुंबई पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती कोर्टापुढे सादर करण्यात आली आहे. या प्रकरणी डीआयजी निशिकांत मोरेंना राज्य सरकारनं सेवेतून निलंबित केलं आहे. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत एक अल्पवयीन मुलीवर विनयभंग करण्याचा आरोप आहे. आरोपी सध्या फरार असून कोणताही संपर्क आरोपीशी झालेला नाही.

नेमके काय आहे प्रकरण –
निशिकांत मोरे हे ५ जून २०१९ रोजी त्यांच्या कुटुंबियांसह पीडित मुलीच्या घरी तिच्या वाढदिवसानिमित्त आले होते. त्यावेळी केक कापण्याच्या घटनेवरून निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी डीआयजींवर मुंबईतील तळोजा पोलीस स्थानकात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच अल्पवयीन पीडित मुलगी ही सुसाईड नोट लिहून तिच्या राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. त्या सुसाईड नोटमध्ये तिनं मोरेंच्या त्रासाला कंटाळून जीव द्यायला जात असल्याचं म्हटलं होतं.

यावर मोरे यांनी दावा केला होता की हा केवळ बदनामी करण्याचा कट आहे. दरम्यान मोरे यांच्या पत्नीसोबत पीडितेच्या कुटुंबियांचे आर्थिक व्यवहार फिसकटल्यानं मोरेंविरोधात ही खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. आता निशिकांत मोरेंच्या पत्नी निशिका मोरे यांनी देखील पीडितेच्या कुटुंबियांविरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार दिलेली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सध्याला पीडितेचे आईवडील जामीनावर बाहेर आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like