विक्रीसाठी आणलेला तलवार, कुकरीचा मोठा साठा एलसीबीकडून जप्त

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – विना परवाना तलवारी, कुकरी, गुप्ती अशी धारदार शस्त्रे शहरामध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई आज (बुधवार) सकाळी रंकाळा टॉवर येथील धुण्याची चावी येथे करण्यात आली.

क्रिपालसिंग सोहनसिंग टाक (वय-३८ रा. आसरेनगर, निपाणी ता. चिक्कोडी, जि. बेळगाव), सुरेश रामचंद्र भंजोडे (वय-५० रा. प्रतिभानगर, निपाणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना दोन इसम रंकाळा टॉवर येथील धुण्याची चावी या ठिकाणी धारदार शस्त्रे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने त्या दोघांचा शोध घेत असताना धुण्याची चावी या ठिकाणी उभ्या असलेल्या दोघांची हालचाल संशयास्पद वाटली. त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये ४ हजार ६०० रुपयांची २ धारदार तलवारी, ५ कुकरी, ३ गुप्ती अशी एकूण ९ धारदार शस्त्रे आढळून आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी एकजण शिकलगरी आहे. त्याच्यावर बेकायदेशीर शस्त्र विक्री आणि शस्त्र पुरवणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, अजय वाडेकर, संजय काशिद, रामचंद्र कोळी, रणजित कांबळे, ओंकार परब, सुरेश पाटील, सुजय दावणे, रमेश डोईफोडे, विलास किरुळकर, अनिल ढवळे, नामदेव यादव, रफिक आवळकर, असिफ कालायगार, सचिन पाटील, अनिल पास्ते यांनी केली.