पुण्यातील डेक्कनच्या परिसरात स्विगीच्या डिलिव्हरी बॉयकडून युवतीचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविल्यानंतर स्विगीचा डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन आला आणि पण त्याने तरुणीशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरूणीने कस्टमर केअरकडे तक्रार केली. पण, त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याचे देखील समोर आले आहे.

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कंपनीच्या व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी लॉचे शिक्षण घेत आहे. ती तिसर्‍या वर्षाला शिकत आहे. डेक्कन परिसरात राहण्यास आहे. तिने (24 जानेवारी) दोन महिन्यांपुर्वी ऑनलाईन स्विगी कंपनीच्या वेबसाईटवरुन खाद्य पदार्थाची ऑर्डर केली होती. त्यानंतर डिलिव्हरी बॉय रात्री दहाच्या सुमारास ऑर्डर घेऊन तिच्या खोलीवर आला. ऑर्डर दिल्यानंतर त्याने तरुणीला पाणी पिण्यास मागितले.

त्यामुळे तरुणी पाणी घेऊन आली. त्यावेळी या डिलिव्हरी बॉय पॅन्टचे बटण आणि चेन उघडून दारात थांबला होता. अश्लिल कृत्य पाहून तरुणी घाबरून गेली. तिने तत्काळ दरवाजा आतून बंद केला. तसेच, तत्काळ स्विगी कंपनीच्या कस्टमर केअरकडे तक्रार केली. मात्र याबाबत कंपनीने कोणत्याही प्रकारची कारवाई न करता बदनामी होईल या भितीने जाणीवपुर्वक माहिती लपविली. तसेच, कारवाई केली नाही. त्यामुळे तरुणीने डेक्कन पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.