‘सोनियाजी मला फोन करून विचारतात की…’, CM उध्दव ठाकरेंच्या वक्तव्यावर ‘हसू’ लागले सगळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील ‘महाविकास आघाडी’ सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज ’महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही’ या पुस्तिकेचा प्रकाशन कार्यक्रम उत्साहात पार पडला. ‘महाविकास आघाडी’ सरकारने मागील वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा या पुस्तिकेतून मांडला आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर मान्यवर आदी उपस्थित होती.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलत असताना सरकारमधील सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन केले. तसेच तीन पक्षाचे सरकार कसे जोमाने काम करतंय, हे सांगितलं. हे सांगत असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत फोनवरुन होत असलेल्या चर्चेची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिलीय. यावरून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

महाराष्ट्र राज्याचे तीन पक्षांचे सरकार तग धरेल का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. पण, या तीन पक्षाच्या सरकारला शरद पवारांसारखे अनुभवी मार्गदर्शन लाभलंय. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीही फोनवरुन काम कसं चाललंय? याची विचारपूस करतात. आमचे लोक तुम्हाला त्रास तर देत नाहीत ना? असेही त्या विचारात, उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलंय अन् उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांनी, मी सोनिया गांधी यांच्याकडे तुमची बाजू लावून धरतो. तिथं मी मागे हटत नाही, असे म्हणून राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कामाचे सोनिया गांधी यांच्याकडे कौतुक करत आहेत, असे सांगितलंय.

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र राज्य चालवण्याचा अनुभव माझ्याकडे नाही, अशी टीका करत होते. पण, अनुभवी सहकार्‍यांची टीमसह असल्याने मला कसलीच चिंता वाटली नाही. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत, असे वारंवार विरोधक बोलत असतात. त्यांना सांगायला हवं की, माझ्या सहकार्‍यांची टीम घरीघरी जाऊन काम करतेय. त्यामुळे मला बाहेर पडावं लागत नाही. इतकं भक्कमपणे हे सरकार उभं आहे.

जनतेच्या विश्वासाने हे सरकार चालतंय. जनतेचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत. तीन चाकी सरकार म्हणून या सरकारची हेटाळणी केलीय. पण, या सरकारचं चौथं चाक हे जनतेच्या विश्वासाचं आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.