तामिळनाडूला आता दुसरे चक्रवादळ धडकण्याची शक्यता, मुसळधार पावसाची शक्यता, रेड अलर्ट जारी

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाईन – बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आता तामिळनाडूत दुसरे चक्रीवादळ घोघावत आहे. शुक्रवारी (दि. 2) तामिळनाडूला या दुस-या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडू व केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचाही अंदाज असल्याने या दोन राज्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तामिळनाडूला निवार चक्रीवादळ धडकून आठवडाही पुर्ण झाला नाही. अशातच आता पुन्हा दुसऱ्या चक्रीवादळाचा राज्याला तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या चक्रीवादळामुळे ताशी 75 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे तामिळनाडू, केरळमधील मच्छीमारांनी शुक्रवारी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात 26 नोव्हेंबरला निवार हे चक्रीवादळ तामिळनाडू, पुडुचेरीला धडकले होते. त्यामुळे तेथील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, निवार चक्रीवादळामुळे सुदैवाने मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली नव्हती.