वाहनधारकांना मोठा दिलासा ! राज्यात नव्या मोटार वाहन कायद्याला तुर्तास स्थगिती : परिवहन मंत्री रावते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूका तोंडावर असताना लागू झालेल्या नव्या मोटार कायद्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. अशा परिस्थितीत लोकांमध्ये नकारात्मकता पसरू नये यासाठी राज्य सरकारने या कायद्याला राज्यात तुर्तास स्थगिती देण्यात आल्याचे आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केले. यासंदर्भात रावते म्हणाले, “नव्या कायद्यानुसार वाढीव दंडाचा फेरविचार करण्याची विनंती केंद्र सरकारकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसेच जोपर्यंत केंद्रीय मंत्र्यांचे या पत्राला उत्तर येत नाही तोपर्यंत या कायद्याचा अध्यादेश राज्यात लागू होणार नाही. त्यामुळे राज्यात सध्या जुन्या कायद्याप्रमाणेच दंडवसूली केली जाईल.”

गडकरींकडून कायद्याचे जोरदार समर्थन :
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी मात्र या नव्या कायद्याचे जोरदार समर्थन करत आहेत. यासंदर्भात त्यांनी नुकतेच म्हटले की, “नव्या कायद्यातील दंडाची तरतूद ही सरकारी तिजोरी भरण्यासाठी करण्यात आलेली नाही तर, वाहतुकीचे नियम न पाळल्याने होणाऱ्या रस्ते अपघातातील मृतांची संख्या रोखण्यासाठी करण्यात आली आहे.” आता राज्य सरकारने केलेल्या विनंतीवर त्यांचे काय उत्तर येते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पत्रातील मागणी :
सरकारकडून लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, भारी दंड म्हणजे राज्यातील जनतेच्या अडचणी वाढवणार आहेत. या पत्रात केंद्र सरकारला मोटार वाहन कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने मागणी केली आहे की वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आकारला जाणारा दंड जनतेच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. लोक जास्त दंड भरू शकत नाहीत. आम्ही सरकारला आवाहन केले आहे, सरकारने चलनाची रक्कम कमी करावी. जर आम्हाला उत्तर मिळते ते पाहून आम्ही पुढील कारवाईवर लक्ष केंद्रित करू.