Coronavirus : ‘कोरोना’मुळे सरकार अलर्टवर ! राज्यात नाईट कर्फ्यू ? राज्याची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्ण संखेमुळे राज्यातील ठाकरे सरकारची चिंता आणखी वाढली आहे. अशातच महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट संकेत ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांने दिले आहेत.

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून शनिवारी मुंबईत 897 रुग्ण आढळून आले आहेत. मागील 11 दिवसांमध्ये अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 608 ने वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. राज्यात वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील ठाकरे सरकार पुन्हा एकदा अलर्टवर आले आहे.

पुण्यात रुग्ण वाढण्याचे प्रमाण 10 %
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मुंबई नंतर पुण्यात देखील रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पुण्यात रुग्ण वाढण्याचे प्रमाण 10 टक्के इतके आहे. पुणे शहराला लागून असलेल्या आणि औध्योगीक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या दोन्ही शहरातील काही भाग कंन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने नागरिकामध्ये पुन्हा दहशत पसरली आहे.

या राज्यातून येणाऱ्यांचे स्क्रिनिंग
मुंबईच्या प्रमुख रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टवर बाहेरुन येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यास बीएमसीने सुरुवात केली आहे. तसेच बीएमसीकडून कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. गुजरात, राजस्थान, दिल्ली, गोवा आणि केरळहून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक लोकांची स्क्रिनिंग करण्यात येत आहे.

28 फेब्रुवारी पर्यंत शाळा बंद
पुण्यात वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आज (रविवार) महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील सर्व शाळा-कॉलेज 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे. हे नवे आदेश उद्यापासून लागू होणार आहेत.

पुण्यात नाईट कर्फ्यू
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता पुण्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी असणार आहे. पुण्यामध्ये शनिवारी एका दिवसात 849 रुग्ण आढळून आले होते. दुसरीकडे कोरोना रोखण्यासाठी ठाकरे सरकार विविध उपाययोजनांवर विचार करत आहे.

विजय वडेट्टीवारांनी दिले हे संकेत
जर लोकांनी स्वत: आपल्या सुरक्षेची काळजी घेतली नाही तर राज्य सरकारला पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. सरकार सर्व पातळीवर उपाययोजना करत आहे. विशेषत: संध्याकाळी 5 पासून होणारी गर्दी टाळण्यासाठी नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सरकार करत असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री साधणार संवाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधून परिस्थितीची माहिती देणार आहेत. आज संध्याकाळी सात वाजता ते राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी कोरोनाला रोखण्यासाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच नवीन नियमावली जाहीर करण्याची शक्यता असल्याने, राज्यातील जनतेचे मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे लक्ष लागून राहिले आहे.