Thane News : मालकाच्या बायकोकडे केली शरीरसुखाची मागणी, तिने दिला नकार अन् मग…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुकानातील कामगाराने त्याच्याच मालकाच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. पण त्या महिलेने नकार देत पतीला सांगणार असल्याचे म्हटले. त्यानंतर घाबरलेल्या या कामगाराने या महिलेची धारधार शस्त्राने हत्या केली. ही घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे घडली. सध्या या आरोपीला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

गुड्डू कुमार उर्फ रंजन असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी डोंबिवली येथे एका किराणा दुकानात काम करत होता. रविवारी दुकानाच्या मालकाने त्याला जेवायला बोलावले होते. जेवणानंतर दुकान मालक आणि त्याची पत्नी दारू प्यायले. त्यानंतर दुकान मालकाला एक अर्जंट फोन आला होता. तेव्हा तो बाहेर गेला. त्यानंतर घरात कामगार आणि पत्नी हे दोघेच होते. त्याचदरम्यान रंजनने याचा फायदा घेत मालकाच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यासाठी तो त्या महिलेवर दबाव टाकत होता. रंजनच्या बोलण्याने महिला घाबरली आणि तिने नवऱ्याला सर्वकाही सांगणार असल्याची धमकी दिली.

दरम्यान, या धमकीनंतर रंजनही घाबरला. त्यातच त्याने धारधार शस्त्राने त्या महिलेवर वार करत चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर रंजनने घटनास्थळावरून पळ काढला. जेव्हा दुकान मालक घरी परतला तेव्हा त्याला त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसली. त्यानंतर त्याने पत्नीला घेऊन रुग्णालय गाठले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आरोपीला अटक
मानपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दुकान मालकाचा जबाब घेतला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी रंजनच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने या घटनेची माहिती दिली आणि गुन्हा कबूल केला.