‘त्या’ महिला पोलिस उपनिरीक्षकाचा अपघात नव्हे तर घातपात ?

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात कार्य़रत असणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा रामदत्त गिरी या राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना ३१ मे रोजी घडली होती. महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या वडिलांनी मुलीचा अपघात झाला नसून तिचा घात झाला असल्याचा आरोप केला आहे. तिला चौथ्या मजल्यावरून चारजणांनी ढकलून दिले असून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी महिला पोलीस उपनिरीक्षक यांचे वडिल रामदत्त गिरी यांनी जिल्हाधीकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

महिला पोलीस उपनिरीक्षक राहत असलेल्या घराच्या चौथ्या मजल्यावरुन पडल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उस्मानाबाद येथील रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनिषा गिरी यांच्या वडिलांनी सोलापूर येथील रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यावेळी शुद्धीवर आल्यानंतर मुलीने हाताने इशारा करून चौघांनी ढकलून दिले असल्याचे सागितले, अशी माहिती मनिषा गिरी यांच्या वडिलांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात दिली आहे.

निवेदनात वडिलांनी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक एच.यु खाडे यांच्यावर आरोप केले आहेत. खाडे यांनी आपल्या मुलीला मानसिक त्रास देऊन तिचा विनयभंग केल्याचे निवेदनात म्हटले आहे. गुढीपाडव्याला मुलगी घरी आली होती त्यावेळी तिने खाडे हे मानसिक त्रास देत असल्याचे आपल्याला सांगितले होते. तशी नोंद तिने स्टेशन डायरीला केली आहे. पोलीस निरीक्षक खाडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी संगनमताने याची माहिती पत्रकारांना देऊन तशी बातमी पेपरमध्ये छापून आणली. यानंतर मुलीने या घटनेची दाद मागण्यासाठी उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकांकडे अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी सुरु असताना मनिषाची बदली शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली.

या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी तसेच पोलीस निरीक्षक एच.यु खाडे, चालक अशीष ज्ञानोबा ढाकणे यांना सहकार्य़ करणारा पत्रकार विकास खाडे व अन्य व्यक्तींनी आपल्या मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्य़ाने दखल घेऊन वरील व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात यावी असे निवदेनात रामदत्त गिरी यांनी म्हटले आहे.