नियमांचे उल्लंघन करत केलेलं आंदोलन ब्राम्हण महासंघाला पडलं महागात, पदाधिकार्‍यांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करत केलेले आंदोलन ब्राम्हण महासंघाला महागात पडले असून पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मास्क न लावणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, परवानगी न घेता आंदोलन केल्याने पोलीसांनी कारवाई केली आहे.

आनंद कन्हैयालाल दवे (वय ४७, रा. गुरुवार पेठ), निलेश श्रीकांत जोशी (वय ३९, रा. आनंदनगर, वडगाव), मनोज सदाशिव तारे (वय ४४, रा. कळस), तुषार नंदकुमार निंबर्गी (वय २८, रा. शिवणे), सौरभ मनोहर वैद्य (वय २६, रा. मांजरी), दिलीप सुरेश तांबेकर (वय ५२, रा. कोथरुड), संतोष मनोहर वैद्य (वय ४२) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी दिनेश वीर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर गणेशविसर्जनसाठी महापालिकेच्यावतीने नवीन कंटेनरची सोय केली आहे. मात्र हे कचऱ्याचे कंटेनर असून आमच्या भावना दुखविल्याचा दावा करत ब्राम्हण महासंघाने सोमवारी महापालिकेसमोर आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी महापालिकेचे फोटो असलेले फलक पाण्याच्या बादलित बुडवित निषेध केला. मात्र, आंदोलन करताना कोणतीही परवानगी घेतली नाही. त्याशिवाय आंदोलनादरम्यान त्यांनी सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्कचा वापर केला नाही. त्यामुळे संबंधितांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सर्वाची जामिनावर सुटका करण्यात आली.

महानगरपालिकेसमोर आंदोलन करताना ब्राम्हण महासंघाने पूर्व परवानगी घेतली नाही. सहपोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग करुन तोंडाला मास्क न लावता कोवीड १९ साथ रोगाचा संसर्ग होईल, असे कृत्य करुन आंदोलन केले. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उपनिरीक्षक व्ही. जी. शिंदे यांनी सांगितले.