जात वैधता प्रमाणपत्रासाठीचा अर्ज आता दहावीनंतरच करावा लागणार 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी दहावीनंतर महाविद्यालयात प्रवेश घेतानाच अर्ज करावा अशा सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) कडून शिक्षण विभागाला देण्यात आल्याचं समजत आहे. याशिवाय त्यानुसार शिक्षण विभागाकडून राज्याच्या जिल्ह्यातील संबंधित सर्व खाजगी अनुदानित, विना अनुदानित स्वयं अर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

बारावी झाल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र यंदाच्या वर्षी पासून बंधनकारक केले आहे. याचमुळे यंदाच्या वर्षी विद्यार्थी पालकांचा बराच गोंधळ आणि धावपळ सर्वत्र पाहायला मिळाली होती. इतकेच नाही तर अनेक विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र यावर्षी वेळेत सादर करता न आल्याने खुल्या वर्गातून प्रवेश घ्यावा लागला असल्याचेही समोर आले. म्हणूनच विद्यार्थी व पालकांची ही हेळसांड थांबवण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापुढे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विद्यार्थी, उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर त्याची पूर्ण पडताळणी होऊन प्रमाणपत्र मिळण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. अनेकदा यासाठी आणखी वेळ होऊन विद्यार्थ्यांना मुदतीमध्ये प्रमाणपत्र प्रवेश घ्यायच्या संस्थांमध्ये सादर करणे अवघड होते. म्हणून हे सर्व टाळण्यासाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांतील विद्यार्थ्यांनी 10 वी पास झाल्यानंतर अकरावीमध्ये प्रवेश घेतेवेळीच आपला जात वैधता प्रमाणपत्रासाठीचा अर्ज ऑनलाईन भरण्याच्या सूचना केल्या आहेत.

सदर प्रक्रिया आमलात आणली गेली तर पडताळणीसाठी समितीलाही पुरेसा वेळ मिळून विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र बारावी पास होण्याच्या आधी मिळू शकेल. परिणामी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ होणार नाही.  मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रस्ताव समितीला  पाठविण्याची जबाबदारी महाविद्यालयीन स्तरावरून पूर्ण करावी असे निर्देशही मुखाध्यापक,  प्राचार्यांना देण्यात आले आहेत. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला या प्रमाणपत्राअभावी खुल्या वर्गात प्रवेश घेण्याचा त्रास वाचणार आहे.
You might also like