मुलीला बुलेट घेऊन देणं वडिलांना पडलं महागात, गावगुंडांनी घरात घुसून केला गोळीबार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्रेटर नोएडामधील मिलक खटाना गावातील युवकांना मुलीचे बुलेट गाडी चालवणे आवडले नाही. यामुळे राग आलेल्या या युवकांनी तिच्या घरात घुसत गोळीबार केला. या तरुणीला आणि तिच्या वडिलांना गाडी न चालवण्यासाठी याआधी धमकी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर देखील त्यांनी न ऐकल्याने शेवटी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल कुमार नावाचा हा शेतकरी या गावात राहत आहे. त्यांना चार मुली असून एक मुलगा आहे. त्यातील तीन मुलींचे लग्न झाले असून त्यातील लहान मुलीला वडिलांनी येण्या जाण्यासाठी बुलेट गाडी घेऊन दिली होती. त्यानंतर गावातील काही गुंड तरुणांना मुलीचे बुलेट गाडी चालविणे खटकू लागले. त्यामुळे त्यांनी मुलीला आणि तिच्या वडिलांना धमकी दिली. मात्र त्यांनी न ऐकल्याने या तरुणांनी थेट घरात घुसत त्यांच्यावर गोळीबार केला. त्याचबरोबर जर मुलगी पुन्हा गाडी चालवताना दिसली तर मुलीच्या वडिलांना जिवंत मारण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी सचिन, बबलू आणि अन्य एका आरोपीच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मात्र सध्या पंचायतीमध्ये ते आपली दहशत वापरून त्यांच्याविरोधात निर्णय देणार आहेत. त्यामुळे सध्या हा परिवार दहशतीच्या छायेखाली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आरोपी असलेला सचिन हा रेकॉर्डवरील आरोपी असून अन्य प्रकरणांत देखील तो तुरुंगात जाऊन आला आहे. त्याचबरोबर अन्य आरोपी बबलू हा देखील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचबरोबर पुढील तपास देखील सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading...
You might also like