पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – विभागीय चौकशी सुरू असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास मदत करून पोलीस खात्यातून काढून देणार नाही या आदेशाच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या शहर पोलीस आयुक्तालयातील वरीष्ठ लिपीक अनिल पुंडलिक माळी (५५, रा.२, सी विंग, अर्णव सोसायटी, त्रिकोणी बंगल्याजवळ, हिरावाडी, पंचवटी) याला मंगळवारी (दि.२७) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.

शहर पोलीस आयुक्तालयातील ३२ वर्षीय पोलीस कर्मचा-याची विभागीय चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या कामात मदत तसेच खात्यातून काढून टाकणार नाही असा आदेश काढून देण्याच्या मोबाईल्यात माळी याने सोमवारी (दि.२६) लाचेच्या स्वरुपात १५ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे त्यांच्या पथकाने सापळा लावला होता.

पोलीस आयुक्तालयातील कॅन्टीन शेजारील टॉयलेटमध्ये तक्रारदाराकडून लाचेची १५ हजार रुपयांची रक्कम घेताच वरीष्ठ लिपीक अनिल माळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. लिपीक माळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली असून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.