आईसह चिमुकल्याचा विहीरीत आढळला मृतदेह 

दौंड : पोलीसनामा आॅनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील वडगाव बांडे येथे एका विहीरीत विवाहीत महिलेसह तिच्या सात वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, राहू गावापासून साधारण दहा कि.मी. अंतरावर असणाऱ्या वडगाव बांडे येथे आज सकाळी एका विहिरीत विवाहित महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. ही महिला भगत कुटुंबातील असल्याची माहिती ग्रामस्थांना समजली. त्यानंतर त्यांनी या घटनेबाबतची माहिती यवत पोलिसांना दिली. विहिरीत असलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी आतोनात प्रयत्न केले. परंतु विहीरीत पाणी असल्याने आणि दोन्ही मृतदेह हे तळाशी असल्याने मृतदेह बाहेर काढण्यात अडचण येत होती.

यवत पोलीसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे, पोलीस हवालदार मारकड यांना घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांना विहिरीत असलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन केल्याने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

सदर महिला व सात वर्षीय मुलगा हा भगत कुटुंबातील असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले. तसेच हा अपघात कि आत्महत्या हे तपासाअंती समजेल अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.