हातावरची मेंदी निघण्यापूर्वीच नववधूवर काळाचा घाला

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – नवविवाहीतेचा घरातील कुलर साफ करताना शॉक बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे घडली. ही घटना आज सकाळी घडली. हातावरची मेंदी निघण्यापूर्वीच नववधूचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत नवविवाहीतेचा बारा दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. अवघ्या बारा दिवसात अशा प्रकारची घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

कोमल संजय शेलार (वय-१९ रा. मादळमोही ता. गेवराई) असे मृत्यू झालेल्या नवविवाहीतेचे नाव आहे. कोमलचे माहेर जालना जिल्ह्यातील तिर्थपुरी हे असून २४ मे रोजी तिचा विवाह मादळमोही येथील संजय शेलार यांच्यासोबत झाला होता. रोजच्या प्रमाणे कोमल घरातील साफसफाई आणि सारवण करत होती. घरातील साफसफाई करत असताना ती कुलरची ओल्या फडक्याने साफसफाई करत होती.

दरम्यान, कुलरमध्ये आगोदरच विद्यूत प्रवाह असल्याने तीला जोराचा शॉक बसला. शॉक बसल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार समजल्यानंतर कोमलच्या सासरच्यांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत तीचा मृत्यू झाला होता. हा प्रकार गेवराई पोलिसांना सांगण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.