मोदींचा लाखमोलाचा सूट खरेदी करणाऱ्या ‘त्या’ व्यापाऱ्याला कोटींचा गंडा

सुरत : वृत्तसंस्था – २०१५ साली झालेल्या जाहीर लिलावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुट विकत घेतल्यानंतर चर्चेत आलेले सुरतचे हिरे व्यापारी लालजीभाई पटेल यांना दोघांनी कोट्यवधींना गंडा घातल्याचा प्रकार समोर आले आहे.

लालजीभाई पटेल हे धर्मानंद प्रायव्हेड लिमिटेडचे चेअरमन आहेत. २०१५ मध्ये पंतप्रधान मोदींच्या लाखमोलाच्या सुटचा लिलाव झाला होता. त्या लिलावात त्यांनी बोली लावून ४ कोटी ३१ लाख रुपयांत हा सुट खरेदी केला होता. त्यानंतर ते चर्चेत आले होते.

अशी झाली फसवणूक

मागील वर्षी लालजी भाई यांच्याकडून हिंमत आणि विजय या कोशिया बंधूंनी पैलू न पाडलेले हिरे उधारीवर घेतले होते. त्यानंतर दोघांनी या हिऱ्यांची किंमत अदा केलीच नाही. त्यानंतर दोघा बंधूंचा पत्ताच लागत नाही. कटारागाममधील त्यांच्या कार्यालयाला टाळे होते. त्यांनी कंपनीकडून ऑक्टोबर २०१८ मध्ये १५०० कॅरेटचे पैलू न पाडलेले हिरे घेतले. त्यानंतर नियमानुसार १२० दिवसात पैसे देणे बंधनकारक होते. परंतु दोघांना व्यवस्थापकाने पैसे देण्याची आठवण करून देण्यासाठी फोन केला तेव्हा त्यांचा फोन बंद होता. असे तक्रारीत म्हटले.