३०० स्क्रू व प्लेट बसवून डॉक्टरांनी तरुणीला दिला नवा चेहरा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – चीनमधील डॉक्टरांनी एका तरुणीच्या पूर्णपणे वाताहात झालेल्या चेहऱ्याला थ्री-डी स्कॅनिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा नवे रूप दिले आहे. हा नवा चेहरा बनविण्यासाठी डॉक्टरांनी तिच्या डोक्यात ३०० स्क्रू व लोखंडी प्लेट बसविल्या आहेत.
चेन लिदान नावाची ही तरुणी शिचुआन एअरलाइन्समध्ये फ्लाइट ॲटेंडेंट होती. चार वर्षांपूर्वी ती सातव्या मजल्यावर कोसळली होती. या अपघातातून तिचा जीव वाचला, पण चेहऱ्याला गंभीर इजा झाल्या होत्या. ती धडपणे बोलूही शकत नव्हती व स्मृतीही हरवून बसली होती. डॉक्टरांनी सांगितले की, चेनचा जीव वाचविल्यानंतर तिला नवा चेहरा देण्याचे काम सर्वात अवघड होते. हल्लीच तिला नवा चेहरा देण्यात आला, पण ती स्वत:ला ओळखू शकली नाही. डॉक्टरांनी तिला तिचा पूर्वीचा चेहरा दाखविला व आरशात नवा चेहराही दाखविला. या चेहऱ्यात आपण पूर्वीप्रमाणेच सुंदर दिसत असल्याचे चेनने सांगितले.

चेनला नवा चेहरा देण्यासाठी डॉक्टर दोन वर्षे तिच्यावर उपचार करत होते. तिचा चेहरा व डोक्याच्या वरच्या भागात थ्री-डी स्कॅनिंग करून सर्वप्रथम तिच्या डोक्याच्या खालच्या भागात लोखंडी प्लेट ठेवली. त्यांनंतर चेहऱ्याला नवा आकार देण्यासाठी २६ वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात ३०० हून जास्त स्क्रू व छोटे खिळ्यांचा वापर केला. यातून तिला नवा चेहरा देण्यात आला. चेनला नवा चेहरा मिळाल्यामुळे तिचे आईवडील अतिशय खूश आहेत. लवकरच तिची स्मृतीही परत येईल, अशी त्यांना आशा आहे.