वाळू वाहतूक करणाऱ्या मालमोटारीने युवकास चिरडले

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – घोड नदीपात्रातील वाळू घेऊन जाणाऱ्या मालमोटारीने पादचारी युवकास चिरडले. यात  त्याचा जागीच मृत्यू झाला. श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी शिवारात आज रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
नितीन सकट (वय 22, रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा) हे मयत युवकाचे नाव आहे. तो वीटभट्टी कामगार आहे. अपघातानंतर मालमोटारीचा चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करून युवकाला धडक देणारी मालमोटार ताब्यात घेतली आहे.
महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने घोड नदीपात्रातून खुलेआम बेकायदा वाळू उपसा  सुरू आहे. आज रात्री साडेसातच्या सुमारास नदीपात्रातून वाळू घेऊन भरधाव वेगात निघालेल्या मालमोटारीने रस्त्याने पायी जाणाऱ्या सकट या तरुणास चिरडले . डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागीच गतप्राण झाला.अपघात होताच ट्रकचालक ट्रक जागेवर ठेवून अंधारात पळून गेला.
मयत युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत मालमोटारीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.