आता ग्राहकच ठरवणार ‘रिंगटोन’चं ‘टायमिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सतत वाजणाऱ्या कॉल्सच्या डोकेदुखीपासून ग्राहकांची सुटका होणार आहे. आपल्याला आलेल्या फोन कॉलची रिंग किती वेळ वाजावी हे आता ग्राहक ठरवणार आहेत. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) कॉलची रिंग वाजण्याचा कालावधी ठरविण्याची मुभा ग्राहकांना असावी, असा प्रस्ताव मांडला आहे. भारतामध्ये व्होडाफोन कंपनीने ही सेवा देऊ केली असून पुढील काही दिवसांमध्ये सर्वच कंपन्या या सुविधा देतील, अशी शक्यता आहे.

सध्या परदेशामध्ये असलेल्या टेलिकॉम कंपन्या अशा पद्धतीची सेवा त्यांच्या ग्राहकांना पुरवतात. या प्रक्रियेसाठी ‘ट्राय’कडून टेलिकॉम कंपन्यांच्या प्रतिक्रिया मागवण्यात आल्या असून त्यावर अभ्यास करून अंतिम मंजुरी ट्रायकडून दिली जाणार आहे.

केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे सचिव एस. के गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या प्रक्रियेसंदर्भातील सर्व बाबींचा अभ्यास करून आम्ही टेलिकॉम कंपन्यांपुढे प्रस्ताव मांडला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत त्यावर चर्चा करण्यासाठी आणि आपली मते नोंदवण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर हा निर्णय लागू करण्याचे धोरण आखले जाईल. या सुविधेचा अनेक नागरिकांना उपयोग होईल.’

असा करता येईल टाइम सेट –

फोन कॉलची रिंग मर्यदित वेळेतच वाजवी यासाठी टेलिकॉम कंपन्यांकडून विशिष्ट कोड तयार केला जातो. त्या कोडवर एसएमएस केल्यानंतर ग्राहकाला कॉलच्या रिंगचा अपेक्षित कालावधी विचारला जातो. साधारण 14 ते 45 सेकंद, असा हा कालावधी असतो. त्याप्रमाणे ग्राहक पर्याय निवडू शकतो.

Visit – policenama.com 

You might also like