त्या प्राध्यपकाने केला ‘भगतसिंग’ यांचा ‘दहशतवादी’ म्हणून उल्लेख

जम्मू : वृत्तसंस्था – जम्मू विद्यापीठातील प्राध्यपकाने क्रांतिकारक भगतसिंग यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्याने विद्यापीठात तणाव निर्माण झाला आहे. विद्यापीठाने प्राध्यपकावर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीआहे. प्राध्यापक ताजुद्दीन यांना निलंबित करण्यात आले आहे.ते पॉलिटिकल सायन्स विषयाचे प्राध्यापक आहेत.

वर्गात शिकवत असताना त्यांनी भगतसिंग यांचा उल्लेख दहशतवादी असा केला. आपण भगत सिंग यांच्याकडे हिरो म्हणून पाहतो पण त्यांच्याकडे दहशतवादी म्हणून सुद्धा पाहिले जात होते असे ताजुद्दीन म्हणाले.

ताजुद्दीन यांचे हे विधान विद्यार्थ्यांना अजिबात पटले नाही. ताजुद्दीन यांच्या विधानाने भावना दुखावल्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तक्रार नोंदवली. ताजुद्दीन यांनी आपल्या विधानाबद्दल माफी सुद्धा मागितली पण प्रकरण आणखी तापण्याची चिन्हे दिसताच त्यांना
विद्यापीठाने निलंबित केले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती बनवण्यात आली असून आठवडयाभरात ही समिती आपला
अहवाल सादर करेल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी ताजुद्दीन म्हणाले, मी सुद्धा भगतसिंग यांच्याकडे क्रांतीकारी म्हणून पाहतो. त्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. लेनिनच्या रशियन क्रांतीसंदर्भात शिकवत असताना देशाविरुद्ध केलेल्या कुठल्याही हिंसाचाराकडे दहशतवाद म्हणून पाहिले जाते असे मी म्हणालो.
दोन तासाच्या लेक्चरमधून कोणीतरी फक्त २५ सेकंदाचा व्हिडिओ बनवला. दहशतवादी या शब्दाचा उल्लेख मी त्या संदर्भात केला होता. माझ्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असे ताजुद्दीन म्हणाले.