राजीनाम्याचे सत्र चालूच ; आणखी एका आमदाराचा राजीनामा 

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आमदारांच्या पाठोपाठ आता काँग्रेसच्या आमदारानेही राजीनामा दिला आहे. पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8fc4fdd0-90cc-11e8-b704-4d7a5cf872ea’]

याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी राजीनामा दिला आहे. मराठा, धनगर, महादेव कोळी आणि मुस्लिम समाजाला वेळोवेळी आरक्षण मिळावे अशी मागणी वारंवार होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत तोंडी आश्वासन दिले पण याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले असताना मला लोकप्रतिनिधी म्हणून या पदावर राहण्यात नैतिकता वाटत नाही असे भालके यांनी सांगितले आहे. त्यांनी आपला राजीनामा  विधानसभा अध्यक्षांकडे फॅक्सद्वारे पाठवला आहे.

गेल्या चार दिवसांपासून मराठा ठोक आंदोलन राज्यभरात सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 24 जुलै रोजी ठिय्या आंदोलन केले होते. आणि सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश २४ तासात काढावा अशी मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यामुळे हर्षवर्धन जाधव यांनी आपला राजीनामा ई-मेलद्वारे विधानसभा अध्यक्षांना पाठवला. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही राजीनामा दिला. दोन्ही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला आहे.

दरम्यान, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर बैठक बोलावलीय आहे. यात राज्यातले सर्व मंत्री सहभागी होणार आहेत त्याचबरोबर मराठा आमदारही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आले आहे.