पुणे, खडकी, देहूरोडसह 62 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांचे बिगुल यावर्षीच वाजणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अखेर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांचे बिगुल यंदा वाजणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. आगामी कँटोन्मेंट निवडणुकीसाठी मतदारांची सुधारित यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करून, ३० एप्रिलला अंतिम मतदारयादी जाहीर करण्याचे आदेश केंद्र सरकारने पुणे, खडकी, देहूरोडसह देशभरातील ६२ कँटोन्मेंट बोर्डांना दिले आहेत.

दरम्यान, या संदर्भात संरक्षण मंत्रालयाचे उपसंचालक राजेश कुमार साह यांनी सर्व कँटोन्मेंट बोर्डांना आदेश दिले असून, मतदार याद्या सुधारणांची कामे करताना करोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी सांगितले.

कँटोन्मेंट निवडणूक कायद्याच्या कलम १० (१) आणि १२ नुसार, दर वर्षी मतदार यादी सुधारणेचे काम केले जाते. त्यानुसार, पुणे कँटोन्मेंट बोर्डाने गेल्या वर्षी एक जुलैला ३७ हजार २०२ मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली होती. त्यावर २० जुलै २०२०पर्यंत नागरिकांच्या हरकती सूचना मागविण्यात आल्या. त्या वेळी करोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन, हरकती सूचना कार्यालयात येऊन देण्यासोबतच ई-मेलवर पाठविण्याची सुविधाही बोर्डाने नागरिकांना उपलब्ध करून दिली होती. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संरक्षण मंत्रालयाने सर्वच कँटोन्मेंट बोर्डांच्या मतदार याद्या सुधारणांच्या कामाला तात्पुरती स्थगिती दिली होती. आता सात महिन्यांनंतर या प्रक्रिया पुन्हा राबवून ३० एप्रिलला अंतिम मतदार यादी जाहीर करण्याच्या सूचना सरकारने कँटोन्मेंट बोर्डांना दिल्या आहेत.

केंद्र सरकारने कँटोन्मेंट बोर्डांना मतदार याद्या सुधारणांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने, याच वर्षी कँटोन्मेंट निवडणुका घेण्याचे नियोजन केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पूर्वी फेब्रुवारी २००३ मध्ये पुणे कँटोन्मेंट बरखास्त केले होते. त्या वेळी केंद्रात भाजपचे सरकार होते. त्यांनी कँटोन्मेंट बोर्डांवर नामनियुक्त सदस्य नेमला नव्हता. मात्र, त्यानंतर केंद्रात सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारने नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर २००८ मध्ये पुणे कँटोन्मेंट बोर्डाची निवडणूक झाली. निवडून आलेले बोर्ड जून २०१४ मध्ये बरखास्त करण्यात आले. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात कँटोन्मेंटच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्या वेळीही केंद्रात भाजपचे सरकार होते. त्यामुळे आताही कँटोन्मेंट निवडणुका लवकर घेण्यात येतील, अशी शक्यता बोर्डातील सूत्रांनी व्यक्त केली.

वॉर्डनिहाय प्राथमिक मतदार : वॉर्ड १ : (क्वीन्स गार्डन-गवळीवाडा) : ४०५७, वॉर्ड २ : (शिवाजी मार्केट) : ४१४२, वॉर्ड ३ : (भोपळे चौक) : ४६४२, वॉर्ड ४ : (न्यू मोदीखाना-धोबीघाट) : ५६८७, वॉर्ड ५ : (सोलापूर बाजार-क्रॉसरोड) : ४९५५, वॉर्ड ६ : (वानवडी-फातिमानगर) : ४८३९, वॉर्ड ७ : (घोरपडी) : ४२८३, वॉर्ड ८ : (महात्मा गांधी रस्ता-ताबूत स्ट्रीट) : ४५९७, एकूण मतदार : ३७ हजार २०२.