विधानसभेसह आगामी महापालिका निवडणुक ‘लक्ष्य’, आता भाजप ‘दक्ष’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून घवघवीत यश मिळविणाऱ्या भारतीय जनता पार्टीने आता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असली तरी आगामी महापालिका निवडणूकही डोळ्यासमोर ठेवली आहे. त्यासाठी पक्षाच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयात आता नियोजनाच्या बैठकाही सुरु झाल्या आहेत. गुरुवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील तसेच जिल्ह्यातील काही मतदारसंघातील सोशल मीडिया सेलच्या टीमची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत दिल्लीपासून गल्लीपर्यंत यश संपादन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आता द्विगुणित झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत’ एक हाती सत्ता’ हे ‘टार्गेट’ पक्षाने आता विधानसभा निवडणुकीसाठी दिले आहे. यंदा राज्यात सर्वच्या सर्व जागा जिंकून विरोधकांचे अस्तित्व संपुष्टात आणायचे हा ‘पण’ करण्यात आला आहे. त्यानुसार पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघाची तयारी करताना आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्याचे ठरले आहे. त्यासाठी आता भाजपच्या पक्ष कार्यालयात बैठका सुरु झाल्या आहेत.

युतीत सहभागी असलेल्या शिवसेनेला किती जागा द्यायच्या, मित्र पक्षांना कसे सामावून घ्यायचे याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर होणार असल्याने प्रत्येक भागात भाजपची ताकद वाढवताना वर्चस्व कसे प्राप्त होईल, यासाठी अन्य पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये आणण्यावरही आता भर दिला जात आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी स्नेहभोजनाचे निमित्त करून एक दिवसापूर्वी सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवकांना एकत्र आणण्यामागे कोणता उद्देश होता ? याचीही चर्चा आता झडत आहे. परिणामी विरोधी पक्षातील नेत्यांना आता अस्तित्वाची चिंता भेडसावत आहे.

आता विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतला जात आहे, त्यात काँग्रेसचे अस्तित्व ‘हद्दपार’ झाले आहे ; पण राष्ट्रवादीचे जिथे-जिथे प्राबल्य आहे, तो भाग आता कसा काबीज करायचा याची रणनीती सुरु झाली आहे. पालिकेच्या सत्तेत काँग्रेसकडून सत्ता हिसकावताना राष्ट्रवादीने भाजप-शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले आणि पुणे पॅटर्नचा प्रयोग केला ; पण युतीला ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही’ अशा अवस्थेत केवळ ‘नामधारी’च ठरवले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अनुकूल असणाऱ्या मतदारसंघात ‘फुटी’चा डाव मांडायचा आणि पराभवाचा नाही तर अस्तित्वहीनचा धक्का द्यायचा अशी रणनीती आखण्यात आली आहे. त्याची जबाबदारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी चांगले संबंध असणाऱ्या ; पण पक्षातील एका दिग्गजावर सोपविण्याची खेळी करण्यात आली आहे.

पुणे पॅटर्नच्या काळात झालेल्या विकासकामांच्या निर्णयाचे श्रेयही आता राष्ट्रवादीचे पदाधिकारी घेत नाहीत इतकी जरब बसविण्यात भाजपने यश मिळवले आहे. त्यामागे राष्ट्रवादीतील अनेक मंडळी राजकीय अस्तित्व आणि भवितव्य याचा विचार करून भाजपमध्ये जाण्यासाठी अनुकूल वेळेची प्रतीक्षा करीत आहेत, अशांना ‘टिपण्या’ची जबाबदारी भाजपमधील काही जणांनी घेतली आहे. एका विधानसभा मतदारसंघाचे प्रभागनिहाय १२ भाग करून त्यानुसार ‘यंत्रणा’ राबवायची ; पण कुठल्याही स्थितीत राष्ट्रवादीचे अस्तित्व संपुष्टात आणायचे यासाठी भाजपची यंत्रणा दक्ष झाली आहे. त्यात अनेक जण आता भाजपमध्ये पक्षांतर करण्यासाठी चाचपणी करीत आहेत मात्र आठही मतदारसंघात भाजपचेच आमदार असल्याने आणि येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी कुणाला ? याचा विचार करून अन्य पक्षातील इच्छुक मंडळी वेट ऍण्ड वॉच’ च्या भूमिकेत सध्या तरी आहे. विशेषतः वडगावशेरी या मतदारसंघात इच्छुकांचा भरणा अधिक आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारी बदलण्यात आली, या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी ‘बदल’ होतो का ? या चिंतेने विद्यमान आमदारांनाही ग्रासले आहे. त्यामुळे आगामी काळात कोणते नवे समीकरण उदयास येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आरोग्य विषयक वृत्त

उपाशीपोटी ‘ही’ ४ फळे खा, नेहमी राहाल निरोगी

‘एनएमसी’ विधेयकामुळे पुन्हा केंद्रविरूद्ध डॉक्टर संघर्षाची शक्यता

जपानचा ताप महाराष्ट्राच्या माथी