चेंजिंग रुममध्ये महिलेला कपडे बदलताना पाहणाऱ्यास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कितीही डिजिटलायझेशनच्या बाता केल्या तरी महिलांवर होणारे अत्याचार ही आजही खुपणारी बाब आहे. सार्वजनिक ठिकाणी सर्वात जास्त महिलांवर  छेडछाड आणि अत्याचारासारख्या घटना घडल्याची अनेक उदाहरणे आहेत . पुण्यातील एम जी रोड वरील एका दुकानातील चेंजिंग रूम मध्ये  कपडे बदलत असताना दुकानातीलच  कामगाराने महिलेचा विनयभंग केला. या महिलेने या कमगाराविरोधात लष्कर पोलिसात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलीसांनी त्याला अटक केली आहे.

इम्रान जाकीर पिरजादे (वय २१, रा. मिठानगर, कोंढवा) असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात ते रात्री आठच्या दरम्यान घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी, ही महिला महात्मा गांधी रोडवरील सेल लागलेल्या एका दुकानात गेली होती. तिथे तिने कपडे पाहिले. ते कपडे आपल्याला व्यवस्थित बसतात का हे पाहण्यासाठी त्या चेजिंग रुममध्ये कपडे बदलत होत्या. त्यावेळी पिरजादे हा आत डोकावू लागला. त्यामुळे या महिलेने आरडाओरडा केला.

त्याला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. लष्कर पोलिसांनी त्याला विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी २४ तासात दोषारोपपत्र दाखल केले असून पुढील आठवड्यात हा खटला सुनावणीला येण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी सांगितले.