विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीतील गॅस गळतीत 7 जणांचा मृत्यु तर 300 जण हॉस्पिटलमध्ये, 3000 लोकांना केले रेस्क्यु

विशाखापट्टणम : येथील एल जी पॉलिमर या केमिकल कंपनीत विषारी स्टायरिन गॅसची गळती होऊन त्यात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यु झाला असून 300 जणांना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विशाखापट्टणम येथील आर आर वेंकटपुरममधील विशाखा एल जी पॉलिमर  कंपनीतून स्टायरिन या रासायनिक गॅसची गुरुवारी पहाटे अडीच वाजता गळती सुरु झाली. त्यामुळे आजू बाजूच्या सर्व गावांमध्ये हा गॅस पसरल्याने तेथील लोकांना डोळ्याला जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यु झाला असून आजू बाजूच्या  ५ गावांमधील 3 हजारांवर लोकांना हलविण्यात आले आहे. तसेच त्रास झालेल्या 300 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हजारो लोकांना चक्कर येणे, उलटी होणे, श्वास घेण्यास होत आहे.

गुरुवारी पहाटे जेव्हा कंपनीतून या गॅसची गळती सुरु झाली. तेव्हा अल्पावधीतच तो जवळपास 5 किलोमीटर परिसरात पसरला. यावेळी सर्व जण आपल्या घरात झोपलेले होते. शेकडो लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ते घराबाहेर आले. रस्त्यावर आलेल्यांना त्याचा अधिकच त्रास होऊन ते रस्त्यात चक्कर येऊन पडू लागले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे विशाखापट्टणमकडे रवाना झाले आहेत. तब्बल ८ तासानंतर ही गॅस गळती बंद करण्यात यश आले आहे. भोपाळमध्ये १ डिसेंबर १९८४ मध्ये अशाच प्रकारे युनियन कार्बाईड या खत कंपनीतून विषारी वायूची गळती मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती.