Unlock 1 : 30 जूनपर्यंत करून घ्या ‘ही’ 6 कामं, अन्यथा होईल मोठी ‘अडचण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात मागच्या दोन महिन्यापासून लॉकडाऊन सुरू होते. सध्या सोमवारपासून यामध्ये अनेक प्रकारची सुट सरकारकडून दिली जात आहे. सर्वसमान्यांना दिलासा देण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज असो किंवा आरबीआयद्वारे लोन मोराटोरियम अथवा सरकारद्वारे घोषित आत्मनिर्भर भारत आर्थिक पॅकेज, या सर्वातून सरकार लोकांना मदत करत आहे.

सरकारने कोरोना व्हायरसमुळे अनेक आर्थिक डेडलाईन्स ज्या 31 मार्च 2020 पूर्ण होणार होत्या, त्यांच्यासाठी शेवटची तारीख वाढवून 30 जून केली आहे. या आर्थिक डेडलाईन्स बाबत आपण माहिती घेणार आहोत.

पॅनकार्ड आधारशी लिंक करणे
सरकारने पॅनला आधारशी लिंक करण्याचा कालावधी 31 मार्चवरून वाढवून 30 जून केला आहे. जर तुम्ही आधार कार्ड पॅनशी लिंक केले नसेल तर ते 30 जूनपूर्वी करावे लागणार आहे.

टॅक्स सवलत मिळवण्यासाठी गुंतवणूक
आर्थिंक वर्ष 2019-20 साठी आयकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलैवरून वाढवून 30 नोव्हेंबर केली आहे. सोबतच टॅक्स सवलतीसाठी कलम 80सी, 80डी, 80ई अंतर्गत गुंंतवणूक करण्याचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे.

2018-19 चा आयटीआर
जर तुम्ही आर्थिक वर्ष 2018-19 साठी आयटीआर रिटर्न अजूनपर्यंत भरला नसेल तर तो फाइल करू शकता. याशिवाय रिवाइज्ड आयटीआरसुद्धा 30 जूनपर्यंत दाखल करू शकता. हे आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती, जी आता वाढवण्यात आली आहे.

कर्मचार्‍यांना मिळणारा फॉर्म-16
सामान्यपणे कर्मचार्‍यांना त्यांच्या कंपनीकडून फॉर्म 16 मे महिन्यात मिळत होता, परंतु यावेळेला सरकारने एका ऑर्डिनन्सद्वारे फॉर्म 16 जारी करण्याची तारीख 15 जून ते 30 जूनच्या दरम्यान केली आहे. फॉर्म 16 एक प्रकारचे टीडीएस सर्टिफिकेट असते, ज्याची आयटीआर दाखल करताना गरज असते.

स्मॉल सेव्हिंग्स अकाऊंटमध्ये रक्कम जमा करणे
जर तुम्ही पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी खात्यात 31 मार्च 2020 पर्यंत कोणत्याही प्रकारची किमान रक्कम जमा नाही केली तर ती 30 जूनपर्यंत करू शकता. किमान रक्कम जमा न केल्यास पेनल्टीची तरतूद आहे, जी पोस्ट खात्याने सध्या हटवली आहे.

पीपीएफ खाते झाले आहे मॅच्युअर
जर तुमचे पीपीएफ खाते 31 मार्चला मॅच्युअर झाले आहे आणि हे खाते पुढील पाच वर्षांसाठी एक्सटेंड करायचे असेल तर हे सुद्धा तुम्हाला 30 जूनपर्यंत करायचे आहे. पोस्ट विभागाने याबाबत 11 एप्रिलला एक सक्युर्लर काढले होते.