थेऊर : तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणारे दोन तरुण अटकेत

थेऊर – कुंजीरवाडी ता. हवेली येथे एका वाहन चालकास तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणार्या दोन युवकास लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून दहा हजार रुपये व चार महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत.

लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रशांत बाळासाहेब मोरे हे आपल्या मालकीच्या हायवा या वाहनातून मुरुम कुंजीरवाडी ते आळंदी म्हातोबा दरम्यान वाहतूक करत असताना अजय दिगंबर वाघमारे व महेश शिवाजी माने रा.पापडेवस्ती हडपसर यांनी मोटारसायकलवरुन येऊन गाडीस आडवी मारली व तू आम्हाला कट का मारला असे म्हणून तलवारीने हायवाची काच फोडून मारहाण करत त्यांच्या कडील दहा हजार रुपये बळजबरीने काढुन घेऊन पळ काढला.यावर मोरे यांनी याबद्दल लोणी काळभोर पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तपास करण्याच्या सूचना दिल्या.

सहाय्यक पोलिस निरीक्षक राजु महानोर रंजन रणवरे पोलिस हवालदार नितीन गायकवाड, मुकुंद रणमोडे, पोलिस नाईक लोकेश राऊत, शंकर साळुंखे, महेंद्र चांदणे, रुपे भगत, पोलिस शिपाई रोहिदास पारखे यांच्या पथकाने आळंदी म्हातोबा परिसरातील तरडे गावच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याशी दोन तरुण पैशाची वाटणी करताना आढळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून दहा हजार रुपये व चार महागडे मोबाईल हस्तगत केले.