सांगली : शहरात भरदिवसा दोन ठिकाणी घरफोडी, पावणेचार लाख रुपयांसह अडीच लाखांचे दागिने लंपास

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील संजयनगरमधील विनायकनगर तसेच विश्रामबागमधील सरस्वतीनगर येथील दोन बंद फ्लॅट फोडून 3.75 लाखांची रोकड, अडीच लाखयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. याबाबत संजयनगर, विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी राजेंद्र पाटील यांनी विश्रामबाग पोलिसात तर विवेक तोरचे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विनायकनगर जवळ असणाऱ्या हनुमान मंदिर शेजारी विवेक तोरचे यांचे घर आहे. शुक्रवारी दुपारी ते मुलावर दवाखान्यात उपचार करण्यासाठी कोल्हापूर येथे गेले होते. रात्री पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास ते घरी आल्यानंतर त्यांना घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी छतावरील लाकडी दरवाजा फोडून घरामध्ये प्रवेश करत बेडरूम मध्ये असणाऱ्या कपाटातील रोख 3.75 लाख रुपये, अंगठी, मंगळसूत्र, टॉप्स असे साडे चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. त्यांनी तातडीने संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

तर विश्रामबाग परिसरातील कृष्णा अपार्टमेंट मध्ये राजेंद्र शहाजीराव पाटील राहतात. बुधवारी ४ सप्टेंबर रोजी कामानिमित्त ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. शुक्रवारी ते परत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी पाटील यांच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून फ्लॅट मध्ये प्रवेश करत कपाटातील सोने व चांदी असे दीड लाख रुपयांचे दागिने लंपास केले. या मध्ये बांगड्या, टॉप्स, मंगळसूत्र, चांदीच्या दोन वाट्या, आरतीचे ताट यांचा समावेश आहे.