हे सरकार जगुही देत नाही आणि मरूही देत नाही : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दोन दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणला आले होते. त्यांची सभेसाठी व्यापाऱ्यांची दुकाने बंद करण्यात आली. लग्नाचे हॉलदेखील बंद केले. एवढेच नाही तर स्मशानभुमीही बंद करायला लावली. ते लोकांना जगुही देत नाहीत आणि मरूही देत नाहीत. काँग्रेसने मुंबईत विकास केला. सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या. भाजप शिवसेनेने मुंबईला लुटले, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज केला.

चेंबुरमध्ये काँग्रेसच्या जल्लोष सभेमध्ये ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले की, १५० कॉन्स्टेबल परीक्षा देऊन पोलिस निरिक्षक झाले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून सलामी ठोकून घेतली आणि दोन दिवसांनी याच निरिक्षकांना पुन्हा कॉन्स्टेबलच बनविण्यात आले. या तरुण पोलिसांचा या फडणवीस सरकारने  अपमान केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

भाजप सरकारचे फक्त काही महिने शिल्लक असून त्यांच्याकडे आर्थिक नियोजन नाही. यामुळे राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे. राज्याच्या तिजोरीवर 5 लाख कोटींचे कर्ज असून खडखडाट आहे. अशा परिस्थितीत केंद्राने मदत करायची सोडून त्यांचा देशाच्या रिझर्व्ह बँकेच्या पैशांवर डोळा आहे. रिझर्व्ह बँकेचेही पैसे हडप करण्याचा डाव भाजपने मांडला असल्याचा आरोप यावेळी अशोक चव्हाण यांनी केला.

संविधान बदलण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या लोकशाही संपवणाऱ्या भाजपला  सत्तेवरून पायऊतार करावे लागेल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.