नवी मुंबईत भाजपला धक्का, 3 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नवी मुंबईत भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. आमदार गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे दिघ्यातील तीन माजी नगरसेवकांनी अखेर भाजपला (BJP) रामराम केला आहे. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थांनी मंगळवारी (दि. 29) माजी नगरसेवक नवीन गवते, अर्पणा गवते आणि दिपा गवते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना शिवबंधन बांधले. पालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक असतानाच गवतेच्या शिवसेना (Shivsena)प्रवेशामुळे शिवेसनेने नाईकांना मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे 52 नगरसेवक घेऊन भाजपचे कमळ हाती घेतलेले ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांचा बुरुज हळूहळू ढासळू लागला आहे. गेल्या वर्षी तुर्भे येथील सुरेश कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता दिघा येथील दुसरे माजी नगरसेवक नवीन गवते यांनी त्यांची पत्नी व भावजय यांच्यासह पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाईकांची साथ सोडली आहे.

राष्ट्रवादीबरोबर 20 वर्षे असलेले ऋणानुबंध तोडून नाईक यांनीही विधानसभा निवडणुकीअगोदर भाजपचा झेंडा हाती घेतला. मावळत्या पालिका सभागृहातील 52 नगरसेवकांनी त्या वेळी त्यांना साथ दिली. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पालिका निवडणुकीच्या तीन महिने अगोदर गेल्या वर्षी तुर्भे येथील नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या चार समर्थक नगरसेवकांसह शिवबंधन हातावर बांधले. नाईकांबरोबर भाजपप्रवेश करणाऱ्या 52 नगरसेवकांपैकी अनेक नगरसेवक शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीत जाणार होते, मात्र कोरोनामुळे निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याने घरवापसी थांबली होती. ती पुन्हा सुरू झाली आहे.

आणखी बारा माजी नगरसेवक महाविकास आघाडीची कास धरणार ?
नाईकांची ताकद दाखविण्यासाठी भाजपच्या उंबरठय़ापर्यंत गेलेले काही नगरसेवक आता परतत आहेत. त्यापैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेत गेले असून नेरुळ, वाशी, घणसोली व कोपरखैरणे व ऐरोली येथील आणखी दहा ते बारा नगरसेवक हे पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीत परतणार आहेत. त्यामुळे नाईकांचे मोठे संख्याबळ घटणार असून पालिकेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी नाईकांना जंगजंग पछाडावे लागणार आहे.