Coronavirus : ‘कोरोना’मुळं पुण्यात तिघांचा मृत्यू, 13 महिन्याच्या मुलाचा समावेश, आतापर्यंत 151 बळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि राज्यात देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. राज्यातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या लक्षणीय आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे तर कोरोनामुळं मृत्यू होण्याचं प्रमाण देखील वाढत आहे. आज कोरोनामुळं पुण्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 13 महिन्याच्या मुलाचा समावेश आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये पुण्यात रूग्णांच्या मोठया प्रमाणावर चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामध्ये पॉझिटिव्ह रूग्ण मोठया संख्येने आढळून येत आहेत. दरम्यान, कोरोना रूग्णांचं बरे होण्याचं प्रमाणे देखील वाढलं आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 151 जणांचा बळी गेला आहे.

पुणे विभागात 3242 कोरोनाबाधित तर आतापर्यंत 1023 रूग्ण झाले बरे

पुणे विभागातील 1 हजार 23 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 242 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 51 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 168 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 104 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 2 हजार 830 बाधीत रुग्ण असून 938 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 741 आहे. कोरोनाबाधित एकूण 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 96 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्हयातील 119 कोरोना बाधीत रुग्ण असून 20 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 97 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 238 कोरोना बाधीत रुग्ण असून 29 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 196 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील 37 कोरोना बाधीत रुग्ण असून 27 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 18 कोरोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 32 हजार 498 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 30 हजार 809 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 689 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 27 हजार 508 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 3 हजार 242 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 90 लाख 80 हजार 526 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 92 लाख 20 हजार 147 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 167 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.