घरासमोर चिकनचे खरकटे टाकण्यावरुन वाद; तलवार, कोयत्याने सपासप वार करुन एकाचा निर्घृण खून

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – घरासमोर चिकनचे खरकटे टाकण्यावरुन एक वर्षापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकाचा तलवार, कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमरास घडली. ही घटना साताऱ्यातील (Satara) बोदगा परिसरात घडली असून सातारा शहर पोलिसांनी (Satara City Police) काही तासात चार जणांना अटक (Arrest) केली आहे.

बजरंग लक्ष्मण गावडे (वय-40 रा. मंगळवार पेठ, सातारा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी आकाश नितीन बल्लाळ (वय -20), अमन इस्माईल सय्यद (वय-20), तुषार प्रल्हाद धोत्रे (वय-24), आकाश उदयसिंह शिंदे (वय-24 सर्व रा. समर्थ मंदिर, बोगदा परिसर, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी आरोपी बल्लाळ याच्या घरासमोर चिकनचे खरकटे टाकण्यात आले होते. यावरून मयत गावडे आणि आरोपी आकाश यांच्यात वाद होऊन मारामारी झाली होती. त्यावेळी गावडे याच्याविरोधात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. या वादातून बल्लाळला तो रहात असलेले घर सोडून दुसरीकडे जावे लागले असा समज झाला होता. याचा राग आरोपी आकाश बल्लाळ याच्या मनात होता.

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बजरंग गावडे हा बोगदा परिसरातील रस्त्यावरुन घरी जात होता. त्यावेळी आरोपींनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. आरोपींनी तलवार आणि कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये गावडे याच्या मानेवर खोलवर घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत तर त्यांनी गावडेचा चेहरा छिन्नविछीन्न करुन घटनास्थळावरु फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास पथकाने गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींना काही तासात अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार प्रशांत शेवाळे, अविनाश चव्हाण, गणेश घाडगे, अभय साबळे, विशाल धुमाळ, शिवाजी भिसे, गणेश भोंगे यांच्या पथकाने केली.