माझी पत्नी जरी “राष्ट्रवादी” मधून उभी राहिली , तरी मी “शिवसेनेच्या” उमेदवाराचाच प्रचार करणार 

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन ( शिल्पा माजगावकर ) – भाजप-सेना युतीनंतर कोल्हापुरात आगामी लोकसभेच्या उमेदवारांबाबत चर्चा सुरू आहे. त्यातच शिवसेनेकडून प्रा.संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांच्यात चुरस रंगणार असे चित्र आहे. महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे महाडिकांना साथ देणार अशी चर्चा होती मात्र “समजा माझी पत्नी जरी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, तरी मी शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करणार असे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. ते मुरगूड येथे आयोजित शिवसेना-भाजप मेळाव्यात बोलत होते.

आधी युतीचा धर्म पाळणार
दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. त्याठिकाणी शिवसेनेचे संजय मंडलिक लोकसभा लढवणार आहेत. सेना-भाजपची युती झाल्यानंतरही चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना मदत करतील अशी चर्चा सुरु झाली. मात्र या सगळ्या चर्चेला आज चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देऊन शांत केले. महाडिक यांच्यासोबतची मैत्री वैगरे बाजूला आधी युतीचा धर्मपाळला जाणार असंही वक्तव्य पाटील यांनी केले आहे. शिवाय स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करण्याचं आवाहन देखील पाटील यांनी उपस्थितांना केले.