CBSE, ICSE शाळांना यावर्षीपासून मराठी बंधनकारक, शिक्षण मंत्र्यांनी काढले आदेश

मुंबई : पोलीसामा ऑनलाइन – महाविकास आघाडीच्या सरकारने सीबीएसई, आयसीएसई, केंब्रिज यासह अन्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा हा विषय सक्तीचा करणारा आदेश आज लागू केला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा आदेश आज (सोमवार) जारी केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणार आहे.

शिक्षणमंत्र्यांनी जारी केलेले आदेश येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2020-21 पासून लागू होणार आहेत. त्यानुसार ज्या ठिकाणी मराठी भाषा विषय शिकवला जाणार नाही, त्या ठिकाणी पहिली व सहावीपासून हा विषय यंदापासून सक्तिचा होणार आहे. यानंतर पुढील वर्षी दुसरी आणि सातवी, त्यानंतर तिसरी आणि आठवी असे टप्प्या टप्प्याने मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. दहावीपर्यंत मराठी हा विषय सक्तीचा राहणार आहे. यासाठीची पुस्तके बालभारती तयार करणार आहे.

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषा अनिवार्य करताना त्यासाठी पदनिर्मितीस मान्यता देण्यात आलेली नाही. यासाठीच्या सोयी निर्माण करण्याची जबाबदारी संबंधित शाळांवर टाकण्यात आलेली आहे. परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यासाठी सवलत अथवा मराठी या विषयातून पूर्णत:सूट देण्याचा अधिकार शांळांना देण्यात आला आहे. महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर मराठी विषय सक्तीचा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.