‘तौक्ते’ चक्रीवादळाचे अति तीव्र चक्रीवादळात रुपांतर ! मुंबई, ठाण्यात पावसाला सुरुवात, कोकणात सर्वत्र धुवांधार सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळाचे रुपांतर रविवारी सकाळी अति तीव्र चक्रीवादळात झाले असून सध्या ते गोव्यापासून १३० किमी तर, मुंबईपासून ४५० किमी आणि वेरावळपासून ८४० किमी दूर आहे. या चक्रीवादळामुळे गोव्यासह कोकणात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच ठाणे, मुंबई परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत असून समुद्राला उधाण आले आहे. चक्रीवादळ आता किनार्‍यापासून आणखी खोल समुद्रात जाण्यास सुरुवात झाली आहे. सध्या किनारपट्टीवर ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहत आहेत. रविवारी दिवसभर पावसाची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी जारी असून लोकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आज लसीकरणही बंद ठेवण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात रात्रीपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी जोरदार वार्‍यांमुळे झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. येत्या काही तासात कोकणासह मुंबई, ठाण्यातील पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे मुंबईकरांना आवाहन करण्यात आले आहे.