डिसेंबर 2017 आधी विकलेल्या वाहनांसाठी देखील FASTag अनिवार्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर 1 डिसेंबर 2019 पासून सर्व खासगी आणि सार्वजनिक वाहनांवर चारचाकी किंवा त्यापेक्षा अधिक FASTag अनिवार्य केला होता. आता परिवहन मंत्रालयाने डिसेंबर 2017 आधी विक्री केलेल्या जुन्या वाहनांमध्ये जानेवारी 2021 पासून FASTag अनिवार्य करण्याची अधिसूचना जारी केली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार 1 डिसेंबर 2017 पूर्वीच्या वाहनांची नोंद झाली आहे. त्यांच्यामध्ये पुढील वर्षी जानेवारी पासून FASTag असणे बंधनकारक असेल. त्याशिवाय एप्रिल 2021 पासून थर्ड पार्टी इन्शूरन्स प्रभावी करण्यासाठी फास्टॅग सक्तीचे करण्याचा प्रस्तावही मंत्रालयाने ठेवला आहे. यासंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानेही एक अधिसूचना जारी केली आहे.

मंत्रालयाने म्हटले आहे की, केंद्रीय मोटार वाहन नियम-1989 नुसार, 2017 पासून नवीन चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी FASTag अनिवार्य करण्यात आले आहे आणि वाहन निर्माता किंवा त्यांच्या डीलरद्वारे याचा पुरवठा करणे देखील बंधनकारक आहे. त्यामुळे 1 डिसेंबर 2017 पूर्वी विक्री केलेल्या जुन्या वाहनांना म्हणजेच एम आणि एन वर्गातील मोटार वाहनांमध्ये फास्टॅग सक्तीचे करण्यासाठी CMVR1989 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव जानेवारी 2021 पासून लागू होईल. मंत्रालयाने या मसुद्याच्या अधिसूचनेला अधिसूचित केले असून, संबंधितांकडून सूचना मागविल्या आहेत.