व्यवसायाच्या स्पर्धेतून शेजाऱ्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – घरगुती साडीला फॉल बिडिंग करण्याचे काम अनेक महिला घरगुती व्यवसाय म्हणून करत असतात. घरासाठी चार पैशांचा हातभार लावणे हा त्यामागील एक प्रयत्न असतो. पण एकाच चाळीत जर दोन महिला हाच व्यवसाय करत असतील आणि त्यांच्यात स्पर्धा सुरु होणार. पण ही स्पर्धा इतकी विकोपाला जाईल असे कोणाला वाटले नव्हते. त्यांच्यातील वादातून शेजाऱ्याच्या दरवाजावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिला व  कुटुंबाला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला गेला. दहिसरमध्ये हा प्रकार घडला असून स्थानिक आणि पोलिसांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे या कुटुंबाला वाचविल्याने प्राणहानी टळली.
या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चंदु सरवय्या आणि संजय सरवय्या अशी अटक दोघांची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी, राजेश भुवालप्रताप गुप्ता (वय ४३) हे हिरा कारागीर आहेत. ते दहिसर पूर्वच्या रावळपाड्यातील श्यामनारायण दुबे चाळीत पत्नी मीरादेवी (वय ४०) आणि दोन मुले धनंजय (वय १६), अनुज (वय १५) यांच्यासह राहतात. मीरादेवी या साडीला फॉल बिडिंग करण्याचे काम करतात. त्यासाठी नुकतीच त्यांनी शिलाई मशीनही खरेदी केली. तर चंदू याची पत्नी प्रफुला (वय ४५) देखील हेच काम करते. मात्र मीरादेवीकडे मशीन असल्याने त्यांचे काम अधिक वेगाने होऊ लागले. त्यांची शिलाईदेखील कमी असल्याने ग्राहक त्यांच्याकडे जाऊ लागले. याचा फटका सरवय्या कुटुंबाला बसला. त्यावरून त्यांचे गुप्ता कुटुंबासोबत वादही होऊ लागले. अखेर राजेश यांनी पत्नी मीरादेवी यांना सरवय्या कुटुंबाशी संभाषण बंद करण्यास सांगितले.
फॉल बिडिंगच्या शिलाईवरून  २६ जानेवारीला त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. तेव्हा सरवय्या याने गुप्ता कुटुंबाला धमकी दिली. त्यानंतर २७ जानेवारीला गुप्ता कुटुंबीय झोपले असताना त्यांच्या दरवाजावर कोणीतरी ज्वलनशील पदार्थ ओतून तो पेटवून दिला. मीरादेवी यांना जाग आली आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकल्याने राजेश तसेच त्यांची दोन मुलेही जागी होऊन मदत मागू लागली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दहिसर पोलिसांचे एक पथकही तेथे दाखल झाले आणि दरवाजा तोडून गुप्ता कुटुंबाला बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. गुप्ता कुटुंबाने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी चंदू आणि त्याचा नातेवाईक संजय सरवय्या यांना अटक केली आहे.