पत्रकाराला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – गरजूला मदत केल्याच्या रागातून एका रिक्षा चालकाने पत्रकारावर रिक्षा घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रविवारी (दि. 3) दुपारी बाराच्या सुमारास विकासनगर किवळे येथे घडला. संजय जयराम धुतडमल (४३, रा. आंबेडकर नगर, देहूरोड) असे जखमी पत्रकाराचे नाव आहे.

त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर सचिन अनंत यादवळे (रा. दत्तनगर, विकासनगर, किवळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय यांनी शिंदे नावाच्या एका व्यक्तीला मदत केली होती. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास संजय त्यांच्या दुचाकीवरून कामानिमित्त जात होते.

विकासनगर येथे आले असता त्यांना एक फोन आला, त्यामुळे त्यांनी त्यांची दुचाकी बाजूला घेतली आणि फोनवर बोलत थांबले. त्यावेळी आरोपी सचिन त्याची रिक्षा घेऊन जात होता. संजय यांना पाहून शिंदे यांना मदत केल्याच्या रागातून त्याने संजय यांच्या अंगावर रिक्षा घातली. संजय यांना लांबपर्यंत फरफटत नेले. यामध्ये संजय यांच्या दोन्ही हाताला, गुडघ्याला, तोंडाला गंभीर इजा झाली. तसेच त्यांच्या दुचाकीचे देखील नुकसान झाले. तपास पोलिस करीत आहेत.