मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतरही ‘या’ 2 नेत्यांना ‘मंत्रि’पदासाठी करावी लागतेय ‘लॉबिंग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. एक महिना झाला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राज्याचे मुख्यमंत्रीपद उपभोगलेले दोन नेते मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून इच्छुक आहेत. मागील साठ वर्षात यापूर्वी केवळ तीन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा मंत्री म्हणून शपथ घेतली. राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी या दोन माजी मुख्यमंत्र्यांवर लॉबिंग करण्याची वेळ आली आहे.

राज्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री हे सर्वोच्च पद आहे. हे पद मिळावे यासाठी दिग्गज आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावतात. हे सर्वोच्च पद मिळाल की राजकीय महत्वकांक्षा पुन्हा तेच पद मिळावं अथवा केंद्रात जावं याकडे बहुतांश नेत्यांचा कल असतो. पण राज्याच्या राजकारणात पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी मंत्रिपद मिळावं म्हणून आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर पुन्हा दुसऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं राजकीयदृष्ट्या फारसं प्रतिष्ठेच मानलं जात नाही. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदावरून दूर झाल्यानंतर आपल्याच मंत्रिमंडळाचे मंत्री असलेल्या शरद पवार यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची धन्यता मानली. त्यानंतर मराठवाड्यातील शिवाजीराव पाटील यांची मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होताच आपल्याच मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेल्या शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लावून घेतली. त्यानंतर प्रदीर्घ काळानंतर मुख्यमंत्री झालेले शिवसेनेचे नेते नारायण राणे यांनी विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वर्णी लावून घेतली.

नारायण राणे यांच्यानंतर तब्बल 19 वर्षांनी राज्याच्या इतिहासात एकाच वेळी दोन मुख्यमंत्री राहिलेले नेते मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपद मिळवण्यासाठी कंबर कसली होती. मात्र, काँग्रेसच्या हायकमांडनी दोन चव्हाणांपैकी एका चव्हाणांचा पत्ता कट केला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/