मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीवरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

ADV

मालेगाव/नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई – आग्रा माहामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात महामार्गावरील चाळीसगाव फाट्यावर झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या आयशर ट्रकने (एमएच 18 बीजी 0117) दुचाकीला (एमएच 19 डीए 4352) जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील तरुण आणि तरुणी यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात तरुणाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला.

अपघातात पंकज मुरलीधर पाटील (वय-25 रा. पिंप्री, ता. चाळीसगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. तर मयत तरुणीची ओळख पटली नाही. अपघातानंतर जमावाकडून मारहाण होईल या भितीने ट्रक चालक द्रोणागिरी गोसावी (रा. अवधान, जि. धुळे) हा अपघात स्थळावरून काही अंतरावर जाऊन थांबला. त्याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

ADV

अपघातात दुचाकीच्या नंबर प्लेटचा चुराडा झाला आहे. पोलिसांनी नंबर प्लेटची जुळवणी करुन उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत माहिती घेतली. अपघातग्रस्तांचा मोबाईल मिळून आला आहे. यानंतर मृत पंकज याची ओळख पटली. त्याचा भाऊ चंद्रभान पाटील याने पंकज अविवाहित असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्यासोबत असलेली तरुणी कोण हे अद्याप समजू शकले नाही. तालुका पोलीस तरुणीची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, कैलास गुजर, सचिन दळवी, अक्षय पाटील, शरद मोगल व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते शफीक अहमद व नागरिकांच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेतून सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.