इंदोरी गोळीबार, खून प्रकरातील आरोपींकडून 2 गावठी कट्टे, 31 जिवंत काडतुसे जप्‍त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – चोरीच्या उद्देशाने वाटसरूला अडवून, त्यांच्या डोक्यात व पोटामध्ये गोळी झाडुन खून करुन, एटीएम सेंटर मधून रक्कम काढून फरार झालेल्या दोघांना गुन्हे शाखा यूनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. हा प्रकार तळेगाव एमआयडीसी मधील इंदोरी गावच्या हद्दीत घडला आहे. पोलिसांनी 2 देशी बनावटीचे गावठी कट्टे, 31 जिवंत काडतुसे व एक लोखंडी चाकु जप्त केला आहे.

तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील मयत इसम याची ओळख पटत नसल्याने व सदर गुन्हा हा संवेदनशील असल्याने मा पोलीस आयुक्तगुन्हे शाखा, युनिट 2 व तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन यांना संयुक्तरीत्या तपास करण्याचे आदेशीत केले.

गुन्हा तपासादरम्यान यातील अनोळखी मयत ओला गाडीवर ड्रायव्हर असल्याचे व त्याचे नाव ज्ञानेश्वर किसन वरबडे असल्याचे समोर आले. मयत चालवित असलेल्या ओला कॅबचा गाडीचा शोध घेतला असता सदर गाडी सावरदरी ता खेड जि पुणे येथे मिळुन आली. सदर गाडीमधील ओला कॅब बुकींग आधारे आरोपीत निष्पन्न करण्यात पोलीसांना यश आले.

आरोपींचे ठाव ठिकाण्याबाबत तांत्रिक विश्लेषणावरुन माग घेतला असता आरोपी हे प्रथम दिल्ली येथे गेल्याचे व नंतर नागपुर येथे आल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हे शाखा, युनिट 2 व तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन यांचे संयुक्त पथक नागपुर येथे रवाना करण्यात आले.

सदर पथकाने शिताफीने वैभव उर्फ पिंटु धनराज बिजेवार (33, रा रामदास पेठ, लेन्डा पार्क, प्लाट क्र 247, हनुमान गल्ली नागपुर), दिगंबर उर्फ अक्षय मधुकर मेश्राम (25, वर्षे रा पाण्याचे टाकीजवळ, मोर्शी अमरावती) यांना नागपुर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्हयामध्ये वापरण्यात आलेले 2 देशी बनावटीचे गावठी कट्टे, 31 जिवंत काडतुसे व एक लोखंडी चाकु जप्त करण्यात आला आहे.

आरोपी यांनी ज्ञानेश्वर किसन वरबडे याचा खुन चोरी करण्याकरीता केला. आरोपीनी त्यांच्या ए.टी.एम. मधुन 13,500 काढले असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपास तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुकत विनायक ढाकणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-2 चे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहा पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने, सहा पोलीस निरीक्षक साधना पाटिल, पोलीस कर्मचारी मयुर वाडकर, प्रशांत सोरटे, सुधीर वाडीले, नितीन तारडे, नितीन बहिरट, लक्ष्मण आढारी, महादेव जावळे, एकनाथ कोकणे, फारुक मुल्ला, प्रविण देळे, नारायण जाधव, संदिप ठाकरे, संजय गवारे, हजरत पठाण, सतीश कुदळे, तुशार शेटे यांनी केली आहे.