Pune : लज्जास्पद ! पती-पत्नीनं एकत्र राहण्यासाठी 2 महिन्यांचं बाळ फेकून दिलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खडकीतील मेथॉडिस्ट चर्चजवळ सकाळी फिरण्यासाठी गेल्यानंतर सापडलेल्या 2 महिन्यांच्या बाळाच्या आईवडिलांचा शोध घेण्यास खडकी पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी बाळाच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पत्नीनं वादानंतर एकत्र राहण्यासाठी हे बाळ फेकून दिल्याचा पोलिसांचा संशय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेथॉडिस्ट चर्चजवळ मॉर्निंग वॉक करताना मंगळवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास सोनाली अडागळे या महिलेला रस्त्याच्या कडेला 2 महिन्यांचं बाळ दिसलं. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं सोशल मीडियावर बाळाच्या पालकांचा शोध सुरू झाला.

सामाजिक कार्यकर्ते निलेश दास यांना व्हॉट्सॲपवर बाळाचा डीपी दिसला ज्यावर मिस यु असंही लिहलं होतं. दास यांनी त्या नंबरवर संपर्क केला असता त्या व्यक्तीनं हा माझ्या बहिणीचा मुलगा असून 2 दिवसांपूर्वीच याचं निधन झालं असं सांगितलं. हे ऐकून दास यांना धक्काच बसला.

यानंतर दास यांनी बाळ जिवंत असून ससून हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगितलं. बाळाच्या मामानं खात्री केली आणि बाळ जिवंत असल्याचं पाहून तो हैराण झाला. मामानं बाळाच्या आई वडिलांचा पत्ताही दिला. दास यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस बाळाच्या पालकांना ठाण्यात घेऊन आले. आधी तर त्यांनी हे बाळ त्यांचं आहे यासाठी नकार दिला. मात्र मामानं मात्र बहिणीचाच मुलगा आहे असं सांगितलं.

बाळाचे वडिल अभियंता असून ते एका खासगी कंपनीत कामाला आहेत. पोलिसांनी बाळाच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी हे बाळ का फेकून दिलं याचा तपास आता पोलीस करत आहेत.

बाळाच्या पालकांमध्ये नेहमीच वाद होत असे. बाळाच्या वडिलांचा त्यांच्या पत्नीवर संशय होता. म्हणून त्यांचं म्हणणं होतं की, हे बाळ त्यांचं नाहीये. त्यांच्यात भांडण होत असल्यानं ते वेगळे रहात होते. मात्र काही दिवसांनंतर त्यांच्यात समेट घडून आला. सोबत रहायचं असेल तर मुलाचा त्याग करावा लागेल असं सांगितल्यानंतर दोघांनी मिळून त्या बाळाला चर्चजवळ सोडून दिलं अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी दिली.