भरधाव एसटी बसच्या टपावरील स्टेपनी पडून दुचाकीस्वार ठार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसच्या टपावरील टायर स्टेपनी अचानक कोसळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जळगाव तालुक्यातील करंज सावखेडा खुर्द दरम्यान मंगळवारी घडली. ही स्टेपनी वळणावर खाली पडून उसळ्यानंतर समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वारांना धडकली. यामध्ये दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घनश्याम उमाकांत पाटील (वय-३७ रा. सावरखेड खु) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.

घनश्याम पाटील हे त्यांचा चुलत भाऊ तापीराम पाटील यांच्यासोबत मोटरसायकलीने जळगावला निघाले होते. जळगाव येथील काम संपवून सावखेडाकडे जात होते. त्यावेळी सावखेडा वळणावर भोकरकडून जळगावकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसची टायर स्टेपनी अचानक कोसळून समोरुन येणाऱ्या पाटील यांच्या दुचाकीला धडकली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी बस चालक सिताराम कोळी व वाहक विशाल थोरात यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

घनश्याम हे घरावर टाकण्यासाठी पत्रे खरेदीसाठी जळगावला गेले होते. दुपारी उशिरापर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या आईने त्याला फोन केला. त्यावेळी त्याने करंज गावाजवळ असल्याचे सांगून पाच मिनीटात घरी येतो असे सांगितले होते. मात्र, पाच मिनीटात तो आला नाही पण त्याच्या मृत्यूची बातमी आली.