2 लाख 40 हजारांवर डल्ला मारणारे ‘ते’ दोन पोलीस अखेर निलंबीत

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

खंडणीच्या पैशातील 2 लाख 40 हजार रुपयांची रक्कम गस्तीवर असताना घेऊन गेल्या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस दलातून निलंबीत करण्यात आले आहे.पोलीस शिपाई अशोक जकप्पा मसाळ (ब.नं- 9998, नेमणूक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर), सुरेश सोमलिंग बनसोडे ( ब. नं- 8924, नेमणूक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन) अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पैशाचा अपहार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपायुक्त डाॅ. प्रविण मुंढे यांनी निलंबीत केले असून, त्या बाबतचे आदेश दिनांक 28 मे (सोमवार) रोजी रात्री निर्गमीत करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी राहूल मनोहर कटमवार यांच्या गाडीला सोपान बाग ते रेसकोर्सकडे जाणाऱ्या अोढ्याजवळ वानवडी पुणे येथे चार अज्ञात इसमांनी मोटारसायकल आडवी लावून त्यांना व त्यांच्या ड्रायव्हरला जबरदस्तीने गाडीत घालून पुणे स्टेशन, नाना पेठ, सेव्हन लव्ह चाैक कात्रज चाैक या परिसरात फिरवून पिस्तूलाचा धाक धाकवत जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या ताब्यातील 14 लाख 30 हजार रुपयांची रक्कम घेवून पोबारा केला होता. याप्रकणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र त्यावेळी रात्र गस्तीवर असलेल्या बिट मार्शलनी त्या खंडणीच्या पैशातील 2 लाख 40 हजार रुपयांची रक्कम गायब केली होती. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता रक्कम हडप करणारे ते पोलीस कर्मचारी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे असल्याचे तपासात समोर आले होते. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण (गुन्हे) यांनी एकत्रीत चाैकशी केली असता दिनांक 22 मे (मंगळवार ) रोजी रात्रीच्या वेळी कात्रज बायपास जवळ एका डस्टर गाडीमध्ये बसलेल्या चार ते पाच इसमांकडून या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी पैशाच्या बॅग घेऊन कात्रज पोलीस चाैकीतील लाकडी लाॅकरमध्ये ठेवल्याचे कबूल केले. यावेळी पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी पंचाना बोलावून सदर लाॅकरचे कुलूप त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडून तोडले असता लाॅकरमध्ये 2 लाख 40 हजार रुपयांची रक्कम मिळून आली.

चक्क पोलिसांनीच खंडणीच्या पैशावर डल्ला मारल्यामुळे पोलीस दलात अनेक चर्चांना उधान आलं होते. त्यामुळे शिस्तबद्ध पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन करणारे बेजबादर वर्तन केल्याप्ररणी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. सदरची कारवाई परिमंडळ-2 चे पोलीस उप आयुक्त डाॅ. प्रविण मुंढे यांनी केली.