दुचाकी चोरणाऱ्यास एक वर्षाची सक्त मजुरी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- दुचाकी चोरी प्रकरणी एकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.पानसरे यांनी एक वर्ष सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसाचा कारावास भोगावा लागेल असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

९ मार्च रोजी २०१४ रोजी रात्री १२.३० च्या सुमारास एजाज रहिम खान यांनी घराजवळ दुचाकी पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात  अमीर तुफेल खान (वय 20, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याला अटक केली. त्याच्याकडून गाडी जप्त केली होती. या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अमीर याला दोषी ठरवले. त्यावेळी तो विवाहित असून, घरातील कर्ता आहे. त्यामुळे त्याला चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सोडून देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली होती. मात्र सरकारी वकील वामन कोळी यांनी त्याला विरोध केला. तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर आणखी गुन्हे प्रलंबित आहेत. त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली होती.

त्यावेळी न्यायालयाने त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी लक्षात घेता त्याला परिविक्षा अधिनियमाचा लाभ देणे योग्य ठरणार नाही. त्याने केलेले कृत्य क्षमेस पात्र नसून, शिक्षेचा समाजात सकारात्मक प्रभाव समाजामध्ये पसरवणे आवश्‍यक असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने  एक वर्ष सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसाचा कारावास भोगावा लागेल असे आदेशही दिले आहेत.