शहरात दुचाकी पेटविण्याचे सत्र सुरुच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात किरकोळ कारणावरून दुचाकी पेटविण्याचे सत्र सुरुच आहे. पुणे-मुंबई रस्त्यावरील वाकडेवाडी आणि कोथरुड परिसरात दोन दुचाकी पेटवून दिल्याचे प्रकार समोर आले आहेत.

वाकडेवाडीत मध्यरात्री पेटवली दुचाकी

सुमित आढाव (वय ३०) हे वाकडेवाडी येथे राहण्यास आहेत. दरम्यान काल रात्री त्यांनी दुचाकी घरासमोर लावली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञाताने आढाव यांच्या दुचाकीवर पेट्रोल ओतून पेटवून दिली. त्यानंतर गाढ झोपेत असलेल्या रहिवाशांच्या निदर्शनास हा प्रकार आला.

दरम्यान आधी झालेल्या वादातून त्यांची दुचाकी पेटवून दिल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एस.देवकर तपास करत आहेत.

कोथरुड

कोथरूड भागातील शास्त्रीनगर परिसरातील रहिवासी किरण शिवाजी साठे (वय २७) यांनी घरासमोर पार्क केलेली दुचाकी दोन दिवसांपूर्वी पहाटे चारच्या सुमारास पेटवून देण्यात आली. त्यानंतर त्यांनी याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मुंढे तपास करत आहेत.